मुंबई - बहुचर्चित कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाल्याचा दावा गुन्हे शाखेतर्फे करण्यात आला आहे. मुंबईच्या ग्रॅंट रोड परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय कीर्ती व्यासचा खून झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी शहजवाणी या दोघांना खून केल्याप्रकरणी संशयित म्हणून पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या चौकशीत दोन्ही आरोपींनी हत्या केल्याचे कबूल केले होते. ज्या गाडीतून किर्तीचा मृतदेह नेण्यात आला, तिथे सापडलेले रक्ताचे डाग यामुळे पोलिसांना भक्कम पुरावे मिळाले असल्याने पोलिसांनी हा खुलासा केला आहे.
कीर्ती व्यास ही ग्रॅंट रोड परिसरात राहात होती आणि अंधेरीतल्या एका सलूनमध्ये कामाला होती. १६ मार्चला ती बेपत्ता झाली ती परत आलीच नसल्याने पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तिचा खून झाल्याचे समोर आले. कीर्तीचा खून करून तिचा मृतदेह माहुलच्या खाडीत फेकला असल्याचे आरोपी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी शहजवाणी यांनी कबूल केले. त्यानुसार ८ मेला पोलिसांनी खाडीत मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
माहुल खाडीत फेकलेला मृतदेह पोलिसांना बरीच मेहनत घेऊन देखील सापडला नाही. ८ मे रोजी ही शोधमोहीम सुरू केली. या विशेष शोधमोहिमेवर दिवसाला २५ हजार रुपये खर्च करूनही मृतदेह शोधण्यात अपयश आल्याने जेवढे पुरावे आतापर्यंत मिळाले आहेत, त्यावर दोघांनाही अटक होऊ शकते, असा खुलासा गुन्हे शाखेने केला आहे. कीर्ती व्यास अंधेरीतल्या सलूनमध्ये कामाला होती. पण तिथेच कामाला असणाऱ्या सिद्धेश ताम्हणकरला तिने काही कारणास्तव कामावरुन काढून टाकले. यानंतर रागाच्या भरात सिद्धेश आणि त्याची मैत्रीण खुशी यांनी ठरवून तिचा खून केला आणि मृतदेह माहुलच्या खाडीत फेकून दिला. या हत्येप्रकरणी आता सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी शहजनवाला या दोघांनाही अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते, असा खुलासा गुन्हे शाखेने केला आहे.