नाशिक: शहरामध्ये मागील आठवडाभरापासून खूनाचे सत्र सुरूच आहे. वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नाशिक हादरून गेले आहे. या आठवड्यात खुनाची सहावी घटना शनिवारी मध्यरात्री घडली. खून झाला की पोलिसांकडून संशयितांना अटक केली जाते; पोलिसांचा वाचक राहिला नसल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी (दि.28) मध्यरात्री प्रेम संबंधावरून झालेल्या वादात उडी घेतल्यामुळे वडाळा रोडवरील शिवाजी वाडी झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या हाणामारीत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत जखमीचा मृत्यू झाला. सागर प्रकाश रावतर (२०) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून हे तिघेही सख्ख्ये-चुलत भावंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. भरत भोये, गौतम भोये, गणेश भोये असे हल्लेखोर संशयितांची नावे आहेत. मुंबई नाका पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
मागील आठवड्यात एका दारुड्या पतीने पत्नीच्या डोक्यात फावडा हाणून ठार मारले होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बापाने मुलाला उशीने गळा तोंड दाबून ठार केले आणि स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंचवटी भागात उघडकीस आली. त्याच दिवशी म्हसरूळला वादाची कुरापत काढून युवकाला टोळक्याने भोसकले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुणे महामार्गावर पौर्णिमा बस थांब्यावर पुण्याच्या पाहुण्याला दुकजकीस्वार हल्लेखोरांनी शस्त्राने वार करून भल्या पहाटे ठार मारले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर जवळ गोदावरी नदीपात्रात युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. या युवकाला ठार मारून नदीत फेकून दिले होते. त्यांनतर पुन्हा शिवाजीवाडी येथे युवकाला भोसकल्याची घटना शनिवारी घडली.