लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संगीतकार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडिया पडताळणी घोटाळा (ब्लू टीक स्कॅम) मध्ये चित्रपट-टीव्ही अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक केली.
करिष्मा कार असे अभिनेत्रीचे नाव असून तिने टीव्ही शो आणि पंजाबी, दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्यावर्षी २२ नोव्हेंबर रोजी तिला गुरू कोहली नावाने इंस्टाग्राम फेसबुक आणि स्नॅपचॅट हँडलसाठी तिची सोशल मीडिया पडताळणी (ब्लू टिक) करण्याची ऑफर देणारा एक संदेश इन्स्टाग्रामवर आला. गुरूने दावा केला की तो कमी खर्चात हे काम करू शकतो. आम्ही गुरूचे इंस्टाग्राम प्रोफाईल तपासले ज्यामध्ये तो संगीतकार असल्याचे सांगितले होते. त्याच्याकडे एक सत्यापित हँडल आहे, असे तिचे व्यवस्थापक जॉन डिसूझा यांनी पोलिसांना सांगितले. त्यांना सोशल मीडिया पडताळणी करण्याचे निकष माहीत आहेत असे सांगत त्यासाठी ३२ हजारांची मागणी केली.