डेहरादून - डेहरादून येथील बहुचर्चित बोर्डिंग स्कूल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विद्यार्थ्याला कलम 376 (डी) अन्वये पोक्सो कोर्टाने आज दोषी ठरवले. त्याचबरोबर शाळेच्या संचालक लता गुप्ता, मुख्याध्यापक जितेंद्र शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपक आणि त्याची पत्नी तनु यांनाही वेगवेगळ्या कलमान्वये दोषी ठरविण्यात आले आहे. या सर्वांवर पुरावा लपवण्याचा, कट रचल्याचा आणि विद्यार्थ्याचा गर्भपात केल्याचा आरोप होता. आरोपी आया मंजूची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
त्याचबरोबर कोर्टाने या प्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्यांनाही तीन - तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या तिघांनाही गेल्या वर्षी बाल न्याय मंडळाने निर्दोष सोडले होते. आज पोक्सो कोर्टाने या तिघांनाही शिक्षा सुनावल्यानंतर तीन दिवसांत बाल न्याय मंडळासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके काय प्रकरण ?२०१८ साली डेहरादून येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल एका महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांना घटनेची माहिती असतानाही त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच मुख्याध्यापक, हॉस्टेल केअरटेकर आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती.पीडित विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये राहत होती. विद्यार्थिनीने आजारी पडल्यानंतर आपल्या मोठ्या बहिणीकडे खुलासा करत बलात्कार झाला असल्याची माहिती दिली होती. यानंतर विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचं उघड झालं होतं. पीडित विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०१८च्या आदल्या दिवशी स्वातंत्र्य दिनाची तयारी करायची असल्याचं सांगत आपल्याला स्टोअर रुममध्ये बोलावण्यात आलं आणि बलात्कार करण्यात आला होता. शाळा प्रशासनावर आरोप होता की, मुलगी गर्भवती होऊ नये यासाठी तिला पाण्यातून औषधं देण्याचा प्रयत्न करण्यात आला.पीडित मुलीने १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची नावे घेतली होती. मुलगी आपल्या बहिणीसोबत बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र राहत होती. मुलीवर बलात्कार झाला असल्याची माहिती मिळताच आई-वडील पोलिसांसोबत शाळेत दाखल झाले होते. पोलिसांनी उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर मुलीचा जबाब नोंदवला होता.