कल्याण : वालधुनीनजीक रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीची पायाभरणी केली जात असताना एक मृतदेह आढळून आला. यामुळे या परिसरात खळबळ माजली आहे. हत्या करून अनोळखी व्यक्तीला पुरण्यात आले असल्याचा संशय असून महात्मा फुले पोलीस ठाणे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
रेल्वे कॅन्टीनच्या पायाभरणीचे काम सुरू असताना, शुक्रवारी सकाळी माती काढताना सर्वप्रथम एक मुंडके आढळून आले. अर्धवट अवस्थेतील या मुंडक्याचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले होते. यामुळे भयभीत झालेल्या कामगारांनी पोलिसांना पाचारण केले. महात्मा फुले पोलिसांनी माती उकरून मृतदेह बाहेर काढला व तो शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविला. अनोळखी व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, कल्याण पश्चिमेतील मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या सुजित पाटील या तरुणाची तीन दिवसांपूर्वी किरकोळ वादातून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी किरण भरम याला सुजितच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. सुजित व किरण एकाच परिसरात राहत होते. तीन दिवसांपूर्वी त्याचा वाद झाला होता. या वादातूनच सुजितची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.