मुंबई - मुंबई महापालिका रुग्णालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकानजीक आढळून आला. रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच वृद्धाच्या कुटुंबीयांनी मालाड, बोरिवली आणि कांदिवली पोलीस ठाण्यात हरवलेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बोरिवली रेल्वे स्थानकानजीक सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ८० वर्षीय वृद्धास शनिवारी दुपारी तीन वाजता कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयातून रुग्णाच्या कुटुंबियांना फोन आला की ते आपल्या बेडवर नाहीत. त्यानंतर ८ वर्षीय आजोबा रुग्णालयातून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. नाईलाजास्तव कुटुंबीयांनी मालाड, बोरिवली आणि कांदिवली पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या चौकशीमध्ये सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास रेल्वे पोलिसांना बोरिवली रेल्वे स्थानकानजीक एक अज्ञात मृतदेह सापडला. पोलिसांनी याबाबत हरवलेल्या रुग्णाच्या कुटुंबाला माहिती दिली. त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ओळख पटवली. मात्र, या सर्व प्रकरणामुळे महापालिका रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था कशी वाऱ्यावर आहे हे पुन्हा चव्हाट्यावर आलं आहे. काही दिवसापूर्वीच केईएम रुग्णालयातून ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण गायब झाला होता. तब्बल १५ दिवसांच्या शोधकामानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. रुग्णालयाच्याच शवागृहात त्यांचा मृतदेह आढळला होता.
खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार
नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल