मुंबई - बेनेट रिबेलो यांच्या हत्येनंतर त्याचे धड दादर येथील प्रभादेवी चौपाटीवर आज सापडले आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी त्यांची दत्तक मुलगी आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींनी बेनेट यांच्या शरीराचे तुकडे करून मिठी नदीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे उघड झाले होते. प्रथम माहीम येथील मगदुम शहा बाबा दर्ग्याच्या मागच्या समुद्रात आढळलेल्या बॅगेत बेनेट यांच्या शरीराचे अवयव सापडल्यानंतर मिठी नदीतही त्यांच्या शरीराच्या अवयावांची एक बॅग सापडली होती. तर शुक्रवारी सकाळी दादर चौपाटीवरदेखील मृत बेनेट यांचे धड सापडले. दादर पोलिसांनी तो भाग ताब्यात घेत तपासणीसाठी शीव रुग्णालयात पाठवला आहे. बेनेट यांच्या शरीराचे सात भाग सापडले असून केवळ पायाकडील अर्धा भाग मिळणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत बेनेट हे १२ वर्षांचे असताना पडून जखमी झाल्याने त्यांच्या मांडीच्या वरील भागात फ्रॅक्चर झाले होते. त्यावेळी बेनेट यांच्या मांडीच्या वरील भागात लोखंडी रॉड टाकण्यात आला होता. दादर येथे आढळलेल्या अवयवांमध्ये तो रॉड आहे. त्याचप्रमाणे आरोपींनी त्यांना बांबू आणि चाकूने केलेल्या हल्ल्याच्या जखमा शरीरावर आढळून आल्या असून बेनेट यांचे गुप्तांग देखील कापले असल्याने मृताची ओळख पटविण्यास मदत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.