केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार RJ अनन्या कुमारी ऍलेक्स राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोच्चीमधील घरात अनन्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अनन्या कुमारी ही केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकीही होती.
अनन्याने २०२०साली कोच्चीमधील खासगी रुग्णालयात वैजिनोप्लास्टी सर्जरी केली होती. मात्र, वर्षभरानंतरही तिला आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. शारीरिक तक्रारींमुळे तिला काम करण्यात अडथळे येत होते. याच कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सर्जरीदरम्यान झालेल्या काही चुकांमुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवल्याचा आरोप तिने केला होता. मात्र, तिने आत्महत्या केली की घातपात झाला, अशी चर्चा सुरु आहे. तिचा मृतदेह एर्नाकुलम शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अनन्या कुमारी ऍलेक्स ही कोल्लम पेरुमन भागात राहत होती. केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारी पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार ठरली होती. २०२१ मधील निवडणुकीत ती मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा मतदारसंघातून निवडणूक लढवत होती. डेमोक्रॅटिक सोशल जस्टिस पक्षाकडून तिने प्रचाराला सुरुवात केली. पक्षातील काही नेत्यांनी धमकी तसेच छळ केल्यामुळे तिने पक्षातून काढता पाय घेतला. अनन्या कुमारी ही केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकी होती. तिच्या हितचिंतकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. याबाबत तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.