लातूर / अहमदपूर : हरवलेल्या एका १९ वर्षीय युवकाचा टेंभुर्णी गावातील एका विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना अहमदपूर तालुक्यात घडली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू असून, मृत्यूचे कारण मात्र समाेर आले नाही.
पाेलिसांनी सांगितले की, अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथील काेंडिबा कासले (१९) हा शनिवार, १६ ऑक्टाेबर २०२१ राेजी सायंकाळच्या सुमारास हरवल्याची तक्रार अहमदपूर पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आली हाेती. दरम्यान, या युवकाचा मृतदेह मंगळवारी टेंभुर्णी गावाच्या शिवारातील एका विहिरीमध्ये आढळून आला. घटनास्थळी अहमदपूर पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी पथकासह तातडीने भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण समाेर येणार आहे. मयत युवकाचा एका व्यक्तीशी वाद झाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली आहे. मयत युवकाचा काेणासाेबत वाद झाला, काेणत्या कारणावरून झाला, याचाही पाेलीस यंत्रणा तपास करत आहे. लवकरच या घटनेचा उलगडा हाेईल, असा विश्वास पाेलीस अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
याबाबत मयताची आई शशिकला कासले (५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवानंद मनाेहर गायकवाड, सुहास खंडेराव गायकवाड, एकनाथ निवृत्ती गायकवाड (तिघे रा. टेंभुर्णी, ता. अहमदपूर), अक्षय जळबा गायकवाड (रा. माेंजापरंडा, ता. कंधार, जि. नांदेड), विश्वनाथ गणपती मसुरे (रा. हाळी, ता. उदगीर) आणि एका मुलीच्या मावस भावाविराेधात अहमदपूर पाेलीस ठाण्यात कलम ३०६, ३२३, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे, अशी माहिती पाेलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली.