चैतन्य जोशी, वर्धा: झाडावर दुपट्ट्याने गळ्याला बांधून लटकलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मृतक युवकाच्या घरच्यांनी तसेच गवळी समज तसेच दूध व्यावसायिकांकडून करण्यात आला. ही घटना दुपारी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास सिंदी मेघे परिसरातील आईनगरी येथे उघडकीस आली. याप्रकरणी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. कृतिक उर्फ वंश गळहाट (१९, रा. डांगे लेआऊट सिंदी मेघे) असे मृतकाचे नाव आहे.
कृतिक गळहाट हा बारावीचे शिक्षण घेत होता. त्याचबरोबर त्याचा दुधाचा व्यवसाय देखील होता. २३ रोजी दुपारच्या सुमारास तो त्याच्या मालकीच्या गाईंना घेऊन चारापाणी करण्यासाठी आई नगरी परिसराकडे गेला होता. मात्र, त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दुपारी आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण नितनवरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला.
नातेवाइकांत आक्राेश, उसळली गर्दी
वंशचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिवारातील सदस्यांमध्ये आक्राेश निर्माण झाला होता. माझ्या मुलाची आत्महत्या नसून घातपात झाल्याचा आरोप मृतक वंशचे आई, वडील तसेच त्याच्या नातेवाइकांकडून केला जात होता. परिसरात चांगलीच गर्दी उसळली होती. पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.