पूनम अपराज
मुंबई - १० वर्षांपूर्वीची मैत्री मित्राच्या जीवावर बेतली आहे. नेरळ येथे मैत्रिणीच्या घरी गेलेल्या मित्राचे पती आणि मैत्रिणीने मिळून १९ तुकडे करून नेरुळला रेल्वे स्टेशननजीक फेकले. मृत मुलाचे नाव सुशील सरनाईक (31) असून तो एका बँकेत चांगल्या पदावर नोकरी करत होता. मुलगा बरेच दिवस घरी न आल्याने त्याच्या आईने १४ डिसेंबरला वरळी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल होती. मात्र, १६ डिसेंबर रोजी नेरळ रेल्वे रुळावर मृतदेहाचे तुकडे सापडल्याने गुन्ह्याची उकल झाली. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी चार्ल्स नाडर (४०) आणि सलोमी पेडराई (३०) या पती - पत्नीस अटक करण्यात आली आहे.
१६ डिसेंबर रोजी नेरळ रेल्वे स्थानकाच्या रुळावर आणि त्याच परिसरात गटाराच्या नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. या मृतदेहाचे अंदाजे १९ तुकडे करून दोन ट्रॅव्हल सुटकेसमध्ये भरण्यात आले होते. शरीराचे काही अवयव आणि शीर घटनास्थळी सापडले नाहीत. घटनास्थळी नेरळ पोलीस आणि कर्जतचे DYSP अनिल घेर्डीकर यांनी तत्काळ धाव घेऊन तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. DYSP अनिल घेर्डीकर यांनी अतिशय कुशल पद्धतीने या गुन्ह्याचा तपास करून आरोपी पती - पत्नीला मीरारोड येथील मित्राच्या घरून बेड्या ठोकल्या.
नेरळ येथील माथेरान लोको शेड येथे कार्यरत असलेल्या तरुणांना परिसरात १६ डिसेंबर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मानवी शरीराचे अवयव दिसून आल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता नेरळ येथील माथेरान लोको शेड आणि राज बाग या सोसायटीला लागून असणाऱ्या नाल्यात दोन सुटकेस फुगलेल्या अवस्थेत दिसून आल्या. या सुटकेस बाहेर काढल्या असता त्यामध्ये मानवी शरीराचे तुकडे केलेले अवयव आढळून आले. या मृतदेहाचे डोके आणि काही अवयव अद्याप आढळलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डॉक्टरांना बोलवण्यात आले. मृतदेहावरून पुरुषाचा मृतदेह असून दोन दिवसापूर्वी या व्यक्तीला मारून टाकण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरने व्यक्त केला. नेरळ रेल्वे स्थानकी परिसरात मारण्यासाठी वापरलेले साहित्य हे काही अंतरावर पोलिसांना एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत मिळून आले आहे.
अशी घडली थरारक हत्येची घटना
DYSP अनिल घेर्डीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, सलोमी, चार्ल्स आणि सुशील १० वर्षांपूर्वी एका कॉल सेंटरमध्ये एकत्र काम करत होते. एवढीत त्यांची ओळख. त्यानंतर गेल्या महिन्यात सलोमीने सोशल मीडियावरून सुशील सरनाईकशी चॅट सुरु केले आणि ५ डिसेंबरला नेरळ येथील आपल्या घरी बोलावून घेतले. रात्री पार्टी करून सुशीलने रविवारची रात्र देखील तिकडेच काढली. सोमवारी उठून तो बँकेत कामावर जाण्यास निघाला. पुन्हा १ आठवड्याने पुन्हा सलोमी आणि चार्ल्सने पार्टी करण्यासाठी त्याला १२ डिसेंबरला म्हणजेच शनिवार आपल्या घरी बोलावले. रात्री पार्टी करून मद्यपान केलेल्या सुशीलाला गुंगीचे औषध देऊन पती - पत्नीने थोड्या प्रमाणावर बेशुद्ध केले आणि त्याच्या मोबाईल काढून घेतला. मोबाईलचे लॉक त्याच्या फिंगर प्रिंटने खोलून त्याच्या बँक अकाउंटवर असलेले ८० हजार रुपये काढले आणि नंतर त्याची हत्या केली. प्रथम शीर आणि एक पाय कापून त्याची विल्हेवाट चार्ल्सने लावली आणि बदलापूर येथे जाऊन एटीएममधून पैसे काढले. ८० हजार रुपये काढून त्यातील २ हजार रुपयांचे कटर खरेदी करून त्याने घरी येऊन मृतदेहाचे तुकडे - तुकडे केले. ट्रॅव्हलिंग बॅग विकत घेऊन त्यात मृतदेहाचे तुकडे भरून त्याने ते नेरळ स्टेशनलगत फेकले आणि स्मिता बाग रिसॉर्टमध्ये एक रात्र घालवली. त्यानंतर त्याने मीरा रोड येथे मित्राच्या घरी पळ काढला.
असा केला गुन्ह्याचा तपास
ज्या सुटकेस सापडल्या त्या कंपनीच्या सुटकेस विकणाऱ्या दुकानात चौकशी करण्यासाठी पोलिसांची पथकं धाडली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी राज बाग सोसायटीच्या सीसीटीव्हीत संशयास्पद दृश्य दिसून आल्यानंतर आरोपींची पोल खोल झाली. सुरक्षारक्षकाच्या मदतीने पोलिसांनी संशयित नाडर राहत असलेला फ्लॅटवर पोलीस पोहचले. त्या फ्लॅटमध्ये प्रवेश करताच पोलिसांनी दुर्गंधी आली. भिंतीवर रक्ताचे डाग आढळून आले. ठिकठिकाणी धूप लावलेले आढळले. त्यानंतर घरमालकाला संपर्क साधला असताना त्याने भाडोत्री असलेल्या आरोपीना कॉल केल्याने त्यांनी फोन बंद ठेवला. पोलिसांची त्यामुळे मोठी पंचाईत झाली. लोकेशन ट्रेस करणं अवघड झालं. शेवटी जो रिक्षावाला या जोडप्याने रिक्षाने फिरवी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आरोपी पती - पत्नीचा ठावठिकाणा लागला.
मुलगा अविवाहित असून वरळी नाका येथील तक्षशिला इमारतीत राहत होता. त्याच्या पश्च्यात त्याची आई, बहीण आणि भाची आहेत. तर आरोपी पती पत्नीला 3 वर्षीय मुलगी आहे.
उच्च शिक्षित होते आरोपी
आरोपी पती चार्ल्स याने दक्षिण अफ्रीकेतून 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले, तर त्याचे वडील डॉक्टर आहेत. आरोपी पत्नी सलोमी हिने एमबीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून मुंबईतील सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून महकविद्यालयीन शिक्षण घेतले आहे.