विरार - बॉडीबिल्डर म्हणून नावारूपाला आलेला आणि विविध शरीरसौष्ठव स्पर्धेत किताब पटकावलेल्या विरारमधील अली सालेमानी (३५) याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेताच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी स्टिरॉइडच्या अतिसेवनामुळे मुंब्र्याच्या बॉडीबिल्डरचा मृत्यू झाला होता.
अली सालेमानीने स्थानिक आणि राज्य पातळीवर अनेक शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याच्या नावावर तीनदा वसई श्री, दहिसर श्री, मुंबई श्री ज्युनिअर आणि महाराष्ट्र श्री ज्युनिअर असे किताब नोंदवले गेले आहेत. अली आपली पत्नी आणि दोन लहान मुलींसोबत विरार पूर्वेकडील साईलीला अपार्टमेंटमध्ये राहत होता. तो काही फिटनेस सेंटरमध्ये खाजगी ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देत होता. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्याच्यावर आर्थिक संकटांना सामना करावा लागत होता. घरच्या बेटाच्या आर्थिक परिस्थीतीमुळे हतबल झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी सांगितले आहे.