ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या मुंब्य्राच्या एका आरोपीस पोलिसांनी बुधवारी अटक केली. एका प्रमाणपत्रासाठी हा आरोपी दोन हजार रुपये घ्यायचा. मॉल, चित्रपटगृहांसह बहुतांश शासकीय कार्यालयांत कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे सुरुवातीला नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण करून घेतले. परंतु आता लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
नागरिक लसीकरण करून घेणे टाळत असल्याने त्यांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये आडकाठी निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली होती. लसीकरण न करताच बोगस प्रमाणपत्र घेऊन बाहेर फिरणारी मंडळी इतरांना धोकादायक ठरू शकत असल्याने याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका संशयित आरोपीकडे बनावट ग्राहक पाठवला. ग्राहकाने त्यास प्रमाणपत्राची मागणी केली. त्यावर तुम्ही फक्त मोबाइल नंबर, आधार कार्ड नंबर आणि दोन हजार रुपये द्या, मी लगेच प्रमाणपत्र देतो, असे आरोपीने पोलिसांच्या या ग्राहकास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून खात्री पटताच आरोपी अश्फाक इफ्तिकार शेख याला अटक केली. तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव आणि दिनेश शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
टोळी सक्रिय असल्याचा संशय
लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणारा अश्फाक इफ्तिकार शेख हा एकटा आरोपी नसून, यात टोळीच सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार आरोपीने आतापर्यंत कुणाकुणाला बोगस प्रमाणपत्रे दिली, त्याचे कोणकोण साथीदार यात सहभागी आहेत, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.