चंद्रपूर : मागील आठ वर्षापासुन कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र जवळ नसतांना खाजगी दवाखाना सुरू करून रूग्णांवर उपचार करणाऱ्या देवकुमार तारापद बुधक या बोगस डाॅक्टरावर मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
मूल तालुक्यातील बोगस डाॅक्टर घरोघरी जावुन थातुरमातुर उपचार करीत असल्याचा प्रकार मागील अनेक वर्षापासुन राजरोसपणे सुरू आहे. सकाळी 6 वाजतापासुन बोगस डाॅक्टर गावोगावी फिरून रूग्णांची तपासणी करतात, तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, याठिकाणी डाॅक्टर आणि कर्मचारी कार्यरत आहे, मात्र परिसरात घरपोच बोगस डाॅक्टर जात असल्यामुळे बहुतांश रूग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता या बोगस डाॅक्टरकडून उपचार करून घेण्यास धन्यता मानत आहेत. मूल तालुक्यातील नांदगांव येथे वैद्यकिय व्यवसायाची कोणतीही पदवी नसताना देवकुमार तारापद बुधक या बोगस डाॅक्टराने मागील अनेक वर्षापासुन नांदगांव येथे एका भाडयाच्या खोलीत दवाखाना सुरू केला आहे, ग्रामीण भागातील अनेक रूग्ण याबोगस डाॅक्टरांकडे जावुन उपचार करीत असल्याची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे यांच्याकडे केली होती, तक्रारच्या अनुषगाने नायब तहसीलदार यशवंत पवार, संवर्ग विकास अधिकारी डाॅ. मयूर कडसे आणि डाॅ. सुमेध खोब्रागडे यांनी आपल्या पथकासह नांदगांव येथे जावून देवकुमार बुधक यांच्या दवाखान्याची चैकशी केली असता तांटिया विद्यापीठ श्री गंगानर राजस्थान येथे बिएचएमएस च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती देवकुमार बुधक याने पथकाला दिली. पदवी नसतानाही त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनात आले, यावेळी दवाखान्याची झडती घेतली असता औषधी आणि रूग्णावर उपचार करणारे साहित्य मिळाल्याने ते जप्त केले. व दवाखान्याल सील करण्यात आले.
येथील तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे कलम 419, 276 भादवी सह महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 2000 कलम 33 (1), 33 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.