मुंबई - काही डॉक्टर त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना मुंबईतील भायखळा, नागपाडा परिसरात बेकायदेशीररीत्या दवाखाना थाटून रुग्णाच्या जीवाशी खेळत होते. अशा ५ बोगस डाॅक्टरांना गुन्हे शाखा कक्ष - ३ च्या पोलिसांनी अटक केली आहे. मागील १० वर्षापासून हे बोगस डाॅक्टर दवाखाना चालवत असून अटक केलेल्या आरोपींमधील एकजण तर अशिक्षित आहे तर बाकी ७ वी ते १२ वीपर्यंत शिकलेले आहेत.मुंबईच्या नागपाडा, भायखळा परिसरात बोगस डाॅक्टर शमशेर कदिर शेख (३८), अन्वर अकबर हुसैन (४५), नईम मोहंमदमिया शेख (४०), नवाब अजगर हुसैन (३६), रिझवानुद्दीन बंजारा (३५) यांनी आपले अवैध दवाखाने थाटले होते. मागील दहा वर्षांपासून नागरिकांना आयुर्वेदिक औषध देऊन हे पाच बोगस डॉक्टर नागरिकांची फसवणूक करत होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखा कक्ष - ३ चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या बोगस डाॅक्टरांवर कारवाई केली. पोलीस चौकशीत यातील एक जण तर अशिक्षित आहे तर बाकी ७ वी ते १२वीपर्यंत शिकलेले असल्याची माहिती उघड झाली आहे. अगदी सध्या आजारापासून ते लैगिंक समस्या निवारण करत असल्याचं समोर आलं आहे.
या आरोपींविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४१९, ४२०, ३३६ आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट १९६१, कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष ३ करत आहे.