मुंबई - पत्रकार आणि पोलीस असल्याची बतावणी करून अत्तर विकणाऱ्या व्यावसायिकाला धमकावून पैसे उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पायधुनी पोलिसांनीअटक केली आहे. त्या दोघांचे अन्य साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वडाळा परिसरात राहणारे शंकर पांडे (५६) यांचा मस्जिद बंदर येथील सॅम्युअल स्ट्रीट येथे अत्तर बनविण्याचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पाचजण त्यांच्या कार्यालयात आले आणि तुम्ही बनावट अत्तर बनवता, अत्तरांचा फोटो काढा अशी बतावणी करून धमकावू लागले. त्यावेळी तुम्ही कोण? असल्याबाबत पांडे यांनी विचारले असता त्यातील एकाने पत्रकार असल्याचे सांगत एका साप्ताहिकाचे ओळखपत्र दाखविले. दरम्यान घाबरून त्याच्यासोबत आलेल्या तिघांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे पांडे यांना संशय आला. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी आल्यानंतर पांडे यांनी त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी पोलिसांनी दोघांकडे विचारपूस केल्यावर पत्रकार तरुणाने त्याचे नाव फ्रान्सिस ऑगस्टीन डिसोजा (२६) आणि दुसऱ्याने म्हणजेच गौरव मोरेने पोलीस असल्याची बतावणी केली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच मी पोलीस नसल्याचे मोरे याने स्पष्ट केले. दरम्यान, या दोघांनी पांडे यांना बनावट अत्तर बनवत असल्याची बतावणी करून धमकावून त्यांना लुबाडणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी फ्रान्सिस आणि गौरवला अटक केली आहे.