कल्याण : टीसी असल्याची बतावणी करीत प्रवाशांचे तिकीट चेक करणा-या दोघा भामट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी खऱ्या टीसींच्या मदतीने बेड्या ठोकल्या आहेत. संदीप पवार आणि रोहिदास गायकवाड अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. दोघे कधीपासून रेल्वेची फसवणूक करीत आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत.
शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चारवर संतोष त्रिपाठी आणि विष्णु सांब्रे हे दोघे टीसी प्रवाशांचे तिकीट चेक करत होते. एका टीसीची नजर पवार आणि गायकवाड या दोघांवर गेली. दोघे स्वत:ला टीसी असल्याचे सांगत होते. दोघांची वागणूक संशयित होती. त्यांची ओळखपत्र चेक केली असता ती बनावट असल्याचे लक्षात आले.
त्यांच्याकडे इतर काही बनावट कागदपत्र सापडले आहेत. त्यांना लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. त्रिपाठी यांच्या तक्रारीवरुन पवार आणि गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस अधिकारी अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.