कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र या लॉकडाऊन दरम्यान कौटुंबिक हिंसाचार वाढताना दिसत आहे. क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या, मारहाण केल्याच्या हिंसक घटना समोर येत आहे. दरम्यान, बोरीवली पश्चिमेला एका ६२ वर्षीय महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीच्या अंगावर उकळलेले पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती हॉलमध्ये झोपले होते आणि पत्नीने पतीला बेडरूममध्ये झोपायला सांगितले. त्याचवेळेस दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर पतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पतीने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळल्यानंतर यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित पती ए.ए. दळवी आणि त्यांची पत्नी शहेनाझ ओल्ड एमएचबी कॉलनीमध्ये राहतात. शहेनाझ ही नेहमीच क्षुल्लक कारणांवरून भांडत असते. शहेनाझच्या या वागणूकीमुळे त्यांचा मुलगा देखील काही वर्षांपूर्वी घर सोडून गेला, असे पतीने तक्रारीत सांगितले. पतीच्या तक्रारीनुसार, ७ मे रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आपल्या फ्लॅटमधील हॉलमध्ये झोपत होते. दरम्यान, शहेनाझने त्यांच्यावर आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि बेडरूममध्ये झोपायला सांगितले. मात्र, शहेनाझच्या बोलण्याकडे पतीने लक्ष दिले नाही. काही वेळाने ती शिवीगाळ करू लागली. नंतर पतीने शहेनाझला ओरडल्यामुळे झोप येत नसल्याचे सांगून गप्प राहण्यास सांगितले. त्यावेळी ती रागाच्या भरात स्वयंपाकघरात गेली आणि थोड्यावेळाने शहेनाझने उकळलेले पाणी पतीच्या अंगावर ओतले.यामुळे पतीची छाती, घसा आणि हात भाजले आहे. पोलिसांनी सांगितले की, पतीला तातडीने कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला कपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तीन दिवसांनी दळवी यांना डिस्चार्ज मिळाला. नंतर शहेनाझविरोधात पतीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शेहनाझविरोधात भा. दं. वि. कलम ३२४, ३३८, आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एमएचबी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले की, अद्याप या प्रकरणाची चौकशी करत असल्यामुळे कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे. सध्या दोघेही पती-पत्नी एकत्र राहत आहेत.
आणखी बातम्या वाचा...
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार
Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस