मेरठमध्ये जा धक्कादायक घटना घडली आहे. दौराला क्षेत्रातील बसपाचे माजी आमदार चंद्रवीर सिंह यांच्या कोल्ड स्टोरेज प्रकल्पात मोठा अपघात झाला आहे. कोल्ड स्टोरेजचा बॉयलर फुटल्याने गॅस लीक झाला आणि स्फोटात फॅक्टरीचे छत उडून गेले.
स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला तर ५० ते ६० कामगार जखमी झाले आहेत. मृतांची संख्या अधिकृतरित्या समोर आलेली नाही. परंतू प्रत्यक्षदर्शींनुसार चार जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक मजूर छत आणि भींतीखाली अडकले आहेत, तर अनेकजण गॅसमुळे बेशुद्ध पडले आहेत. या सर्वांना मेरठच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चंद्रवीर सिंह यांच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुपारी ३.३० वाजता ही दुर्घटना घडली आहे. गॅसच्या प्रकोपात येऊन ५० हून अधिक मजूर बेशुद्ध झाले आहेत. मोठा आवाज होताच आजुबाजुचे लोक जमा झाले आणि तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. पोलीस आणि फायरब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या असून मजुरांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच डीएम, एसएसपी, एडीएम सिटी मॅजिस्ट्रेट, एसडीएम, सीएमओ आणि एसपी सिटी घटनास्थळी पोहोचले. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री संजीव बल्यान, माजी आमदार संगीत सोम हेही घटनास्थळी पोहोचले आहेत. एकामागून एक, ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना घेऊन सुमारे 11 रुग्णवाहिका मेरठला पोहोचल्या. 2-3 जेसीबी घटनास्थळी मागवण्यात आले आहेत, ढिगारा उचलून मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे.