लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या मतदानात सहभागी होता येऊ नये म्हणून बोखारा ग्रामपंचायतच्या एका सदस्याचे चौघांनी अपहरण केले. त्याला मौदा येथील एका हॉटेलमध्ये २४ तासांपेक्षा जास्त वेळ डांबून ठेवले. मतदान आटोपल्यानंतर त्याची सुटका केली आणि या प्रकाराची कुठे तक्रार केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली. पीडित सदस्याने मानकापूर ठाण्यात बुधवारी तक्रार केल्यानंतर या खळबळजनक प्रकरणाचा भंडाफोड झाला.पोलिसांच्या माहितीनुसार, बोखारा येथील शकिल अनवर शेख (वय ३५) असे फिर्यादीचे नाव आहे. ते बोखारा ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी पार पडली. या निवडणुकीत आरोपी रणजित आणि अभिजित चव्हाण यांची नातेवाईक महिला उमेदवार उभी होती तर, त्यांच्या विरोधात शकिलने उमेदवारी दाखल केली होती. त्यालाच मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवले तर आपला उमेदवार विजयी होईल, असे गृहित धरून आरोपी रणजितसिंह चव्हाण (वय ३५), अभिजित ऊर्फ मोंटू चव्हाण (वय ३०), दिलीप बरडे (वय ३७) आणि शुभम दीक्षित (वय २५, सर्व रा. बोखारा) यांनी बोखारा येथील शकिल अनवर शेख यांना १६ मार्चला दुपारी १२. ४५ च्या सुमारास ताजनगरातील केजीएन सलूनमधून आपल्या स्कॉर्पिओत बसविले. मतदानाविषयी बोलू असे म्हणत त्यांना थेट मौदा येथील ओयो हॉटेलमध्ये नेले. तेथे १०५ क्रमांकाच्या रूममध्ये शकिल आणि अन्य एकाला जबरदस्तीने डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांना आरोपींनी मानकापुरात आणून सोडले. यावेळी आरोपी मोंटू चव्हाणने शकिलला चाकूचा धाक दाखवला. पोलिसांकडे तक्रार नोंदविली तर तुला आणि तुझ्या कुुटुंबातील व्यक्तीला ठार मारू, अशी धमकीही दिली. चव्हाणच्या या धमकीला न घाबरता शकिलने मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपी दिलीप बरडेला अटक करण्यात आली. तो वेल्डींग वर्क शॉपचा मालक असल्याचे समजते. अन्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
बोखारा ग्रामपंचायतच्या सदस्याचे अपहरण : उपसरपंचपदाचा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 1:23 AM
उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या मतदानात सहभागी होता येऊ नये म्हणून बोखारा ग्रामपंचायतच्या एका सदस्याचे चौघांनी अपहरण केले. त्याला मौदा येथील एका हॉटेलमध्ये २४ तासांपेक्षा जास्त वेळ डांबून ठेवले.
ठळक मुद्देनिवडणुकीच्या मतदानापासून ठेवले दूर : एकाला अटक, तिघे फरार