- मंगेश कराळे
नालासोपारा : बॉम्बस्फोट प्रकरणी जामीन मंजूर झालेला ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’चा कार्यकर्ता वैभव राऊत गुरूवारी रात्री नालासोपारा येथील घरी परतला. यावेळी त्याचे दीड ते दोन हजार जमलेल्या जनसमुदायाने जंगी स्वागत केले आहे. तो मागील ५ वर्षांपासून तुरुंगात होता.
१० ऑगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र दहशतवात विरोधी पथकाने ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’चा कार्यकर्ता वैभव राऊत याला नालासोपाऱ्यातील घरातून अटक केली होती. मुंबई एटीएसने त्याचा घरावर छापा मारला होता. वैभवच्या घरात व गावातील दुकानात ५ गावठी पिस्तुल, ३ अर्धवट तयार गावठी पिस्तुल, ९ एमएमचे ११ राऊंड ७.६५ एमएमचे ३० राऊंड, शस्त्रांचे अनेक सुटे भाग (उदा. स्प्रिंग, ट्रिगर, २२ गावठी बॉम्ब आणि ५० गावठी बॉम्ब तयार होतील इतकी स्फोटके, बॅटऱ्या, डिटोनेटर्स) असे साहित्य मिळाले असल्याचे सांगत एटीएसने अटक केली होती.
याशिवाय त्याच्याकडून एक डायरीही जप्त करण्यात आली होती. या डायरीत आरोपीचे हल्ल्याचे नियोजन आणि बॉम्ब तयार करण्याविषयीची तपशीलवार माहिती होती. पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलवर हल्ला करण्यासाठी बॉम्ब तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मागील ५ वर्षांपासून तो तुरुंगात होता. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने आरोपी वैभव राऊतला जामीन मंजूर केला होता.
वैभव राऊतला जामीन मिळाल्याचे वृत्त आल्यापासूनच नालासोपाऱ्याच्या सोपारा गावातील भंडार आळीत उत्साहाचे वातावरण होते. त्याच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. गुरूवारी तो घरी येणार असल्याने हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उभे होते. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करून त्याचे स्वागत करण्यात आले. वैभवने हातात भगवा झेंडा फडकावत जामीन मिळाल्याचा जल्लोष साजरा केला.