नवी दिल्ली - गुरुवारी लखनौच्या एका कोर्टात गावठी बॉम्बचा स्फोट झाला. लखनौच्या वजीरगंज दिवाणी कोर्टामध्ये हा बॉम्बस्फोट झाला. स्फोटानंतर कोर्टात खळबळ माजली. एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा स्फोट वकिलांच्या दोन गटातील वादामुळे करण्यात आला होता. हा बॉम्बस्फोट म्हणजे कोर्टात उपस्थित असलेल्या वकीलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. पोलिसांना बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव जीतू यादव असे आहे. वापरलेला बॉम्ब हे स्थानिक पातळीवर बनविलेले गावठी बॉम्ब होते.
वजीरगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची चौकशी करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी घटनास्थळावरून आणखी 3 जिवंत बॉम्ब जप्त केले आहेत.