नवी दिल्ली - मित्रासाठी कायपण करणाऱ्या एका युवकाला केलेल्या कृत्यामुळे चांगलीच अद्दल घडली आहे. शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी द्वारका येथील रहिवासी २४ वर्षीय अभिनव प्रकाशला अटक केली आहे. स्पाइसजेटच्या विमानात बॉम्ब असल्याचा बनावट कॉल त्याने केला आणि सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली. अभिनवनं अलीकडेच पुणेसाठी उड्डाण घेणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचं सांगितले. चौकशीत अभिनवने केलेल्या खुलाशामुळे पोलिसांनी डोक्यावर हात मारला.
दिल्लीहून पुण्याला जाणारं स्पाइसजेट विमान गुरुवारी काही काळ थांबवावं लागले. एका अज्ञात व्यक्तीने या विमानात बॉम्ब असल्याचं म्हटलं. रात्री ९.३० वाजता दिल्लीहून हे विमान उड्डाण घेणार होते. परंतु कॉल आल्यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. CISF द्वारे सर्व प्रवाशी आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.
सर्व १८२ प्रवासी आणि क्रू मेंबरला उतरल्यानंतर सुरक्षा जवानांनी संपूर्ण विमानाची पडताळणी केली. त्यात काहीच आढळलं नसल्याने हे विमान पुण्यासाठी रवाना झालं. स्पाइसजेटचे सुरक्षा संचालक वरूण कुमार यांनी अज्ञात कॉलविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर तपास पथकाने फोन आलेल्या नंबरची चौकशी केली. त्यात द्वारका येथील २४ वर्षीय अभिनव प्रकाश सापडला. पोलिसांनी धाड टाकत तात्काळ अभिनवला अटक केली.
गर्लफ्रेंडसोबत जास्त वेळ घालवायचा होता म्हणून...अभिनव प्रकाशनं खुलासा केला की, त्याचा मित्र राकेश उर्फ बंटी आणि कुणाल सहरावत अलीकडेच मनालीला गेले होते. त्याठिकाणी २ मुलींसोबत त्यांची मैत्री झाली. या दोन्ही मुली स्पाइसजेटच्या विमानानं पुण्याला जात होत्या परंतु अभिनवच्या मित्रांना आणखी काही वेळ गर्लफ्रेंडसोबत घालवायचा होता त्यामुळे विमान उशीर करण्याचा प्लॅन तिघांनी आखला असं त्याने सांगितले.
त्यानंतर अभिनवने त्याच्या मोबाईलवरून स्पाइसजेट कॉल सेंटरला फोन केला आणि दिल्लीहून पुण्याला उड्डाण घेणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचं सांगितले. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला परत फोन केला तेव्हा त्याचा मोबाईल स्वीच ऑफ होता. त्यानंतर अभिनवने फ्लाईटमध्ये बसलेल्या मित्रांच्या गर्लफ्रेंडला कॉल केला आणि विमान उशिराने जाणार असल्याचं म्हटलं.
अभिनव अटक होताच मित्र फरार जेव्हा अभिनव प्रकाशला अटक केली हे समजताच त्याचे दोन्ही मित्र फरार झाले. पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहे.