पनवेल - पनवेलमधील आपटा बस स्थानकावरील बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली होती. रात्री कर्जतवरून आपट्याला येणारी बस आपटा बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला एका पिशवीत काही तरी टाईम बॉम्बसारखे असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब नाशक व शोधक पथकाला कळवले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात भा. दं. वि. कलम २८६ सह भारतीय स्फोटक कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रात्री ११. ५ वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह अलिबागहून बीडीडीएस आणि डॉग स्कॉड पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत लोकांना याची माहिती मिळाली असल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी सर्वांना बसपासूनच दूर केले होते. आलेल्या बाँब शोधक पथकाने पाहणी केली असता ती वस्तू खरोखरच बॉम्ब असल्याचे आढळून आले. रात्री उशिरापर्यंत बाँब निकामी करण्याचे काम सुरू झाले. शेवटी रात्री साडेतीनच्या सुमारास यशस्वीरीत्या बॉम्ब निकामी केले गेले आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.