डोंबिवली: गेल्या काही दिवसापासून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना मानपाडा पोलिसांनी अशा गुन्हयातील दोघा चोरटयांना सीसीटिव्ही कॅमेराच्या मदतीने अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून यात 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.विवेक रमाशंकर तिवारी आणि मनोजकुमार भारतसिंग ठाकूर अशी अटक आरोपींची नावे असून ते दोघेही पुर्वेकडील दावडीगाव परिसरातील राहणारे आहेत.
मानपाडा हद्दीत घडणा-या सोनसाखळी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे आणि सुरेश डांबरे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार केले आहे. ज्या परिसरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्या परिसरातील जवळपास 50 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यात पोलिसांना दोघे संशयित एका बाईकवर दिसून आले आणि त्यांनी गुन्हयाच्या वेळी जे बूट आणि कपडे घातले होते तेच बहुतांश गुन्हयात घातलेले दिसून आले. पोलिसांना सीसीटिव्ही कॅमेरावरून हा धागा सापडला आणि त्यांनी शोध घेण्यास सुरूवात केली. अचानक एका ठिकाणी पोलिसांना रस्त्यावरु न जात असताना त्याच प्रकारचे बूट आणि कपडे घातलेले दोघे एका दुचाकीवर दिसले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता. ते सोनसाखळी चोरणारे असल्याचे निष्पन्न झाले. ते हे दोघेही मुळचे उत्तरप्रदेशचे आहेत. ते एका ठिकाणी काम करीत होते. परंतू लॉकडाऊनननंतर बेरोजगार झाल्यावर त्यांनी लूटमारीचा धंदा सुरु केल्याचे तपासात समोर आले. मानपाडा, टिळकनगर आणि रामनगर पोलिस ठाण्यात त्यांनी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले असून त्यांच्याकडून दुचाकी, दोन मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा 7 लाख 11 हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक बागडे यांनी दिली.