बोर्डी : रानशेत ग्रामपंचायतीच्या वांगडपाडा येथील वर्षा सुरेश घोषे (वय ८) हिची सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरानजीक प्रफुल्ल ऊर्फ प्रमोद घोषे (वय ४७) यांनी कोयत्याने वार करून हत्या केली. डहाणू पोलिसांनी आरोपीला मंगळवारी सकाळी जंगलातून अटक केली. त्याच्यावर कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रानशेत ग्रामपंचायतीच्या वांगडपाडा या आदिवासी पाड्यावर वर्षा घोषे राहत होती. येथील पाण्याच्या टाकीजवळ याच पाड्यावर राहणाऱ्या आरोपीने सोमवारी दुपारी कोयत्याने तिच्या तोंड, गळा, पाठ व दोन्ही हातावर वार केले. स्थानिक रहिवासी विलास बारक्या बोलाडा (वय ४०) यांनी जाब विचारताच त्यालाही जखमी करून आरोपी जंगलात पळाला. या जीवघेण्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला. डहाणू पोलिसात फिर्याद नोंदविल्यानंतर जंगलात रात्रभर शोधमोहिम राबवून मंगळवारी सकाळी आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ हत्या आणि ३०७ हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनाजी नलवडे यांनी मंगळवारी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागात महिला अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. आदिवासी पाड्यावरच्या अल्पवयीन मुलीवर घडलेल्या या हिंसक हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.