कल्याण - पश्चिमेतील एसटी बस आगाराजवळ असलेल्या एका मोबाईल दुकानाच्या भिंतीला रात्रीच्या वेळी छिद्र पाडून वेगवेगळ्या कंपनीचे सुमारे २० लाख रुपयांचे मोबाईल चोरुन पोबारा करणा-या सराईत गुन्हेगार आलम मंटु शेख (४२, रा. झारखंड) आणि मंजूर मुनीफ शेख (३९, रा. बिहार) या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दोघांना कल्याण न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.डोंबिवली पूर्वेतील सागाव परिसरात असलेल्या एका मोबाईल दुकानावर दरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुण यांच्यासह पोलीस हवालदार नरेश जोगमार्गे, विलास माळशेट्टे, दत्ताराम भोसले, ज्योतीराम साळुंखे, सुरेश निकुळे, अजित राजपूत, मंगेश शिर्के, निवृत्ती थेरे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा आणि राहुल ईशी यांनी सदर ठिकाणी सोमवारी मध्यरात्री सापळा लावला होता. यावेळी, चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांना पकडण्याचा प्रयत्न पथकाने केला. मात्र, त्यातील चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. तर, पकडण्यात आलेल्या आलम मंटु शेख (४२, रा. झारखंड) याच्या अंगझडती एक राउंड लोड असलेला एक गावठी कट्टा तर मंजूर मुनीफ शेख (३९, रा. बिहार) याच्याकडे एक लोखंडी कटावणी आणि इतर दरोडा टाकण्याचे साहित्य पथकाला मिळून आले.आलम आणि मंजूर या दोघांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढिल तपास कल्याण गुन्हे शाखा करित आहे. गुन्हे शाखा कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन हे पळून गेलेल्या चार आरोपींचा शोध घेत आहेत
भिंतीला छिद्र पाडून महागडे मोबाईल लांबवणारे दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 7:45 PM
कल्याण गुन्हे शाखेची कारवाई
ठळक मुद्दे या दोघांना कल्याण न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पळून गेलेल्या चार आरोपींचा शोध घेत आहेत