मुंबई - मालाड सबवे येथे पाणी भरल्याने सब-वे म्हणजेच रेल्वे ब्रिजच्या खाली स्कॉर्पिओ कारमध्ये (एमएच ०१; बीए२१६९) अडकलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सोमवारी रात्री ही ११. ३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून आज पहाटे चार वाजता रुग्णालयाने दोघांना मृत घोषित केले. मालाड पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इरफान खान (३८) आणि गुलशाद शेख (४०) अशी मृत इसमांची नावे आहेत.
काल रात्री ११. ३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कालही दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळीही पावसाने जोर धरल्याने मालाडच्या सब-वेमध्ये खूप पाणी भरले. रात्रीच्यावेळी एक स्कॉर्पिओ या सब-वेतून जात असताना ही कार अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात अडकली. दहा फूट पाण्यात कार फसल्याने कार पुढे जाऊ शकली नाही. तसेच मागेही नेता येत नव्हती. कारच्या सर्व बाजूने पाणी भरल्याने कारमध्ये असलेले इरफान खान आणि गुलशाद शेख हे मित्र कारमध्येच अडकले. इरफान खान यांनी कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता पाण्याच्या प्रवाहाने कारची काच फुटली आणि कारमध्ये पाणी शिरल्याने त्यांना बाहेर पडणं मुश्किल झालं. परिणामी या दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला.
रात्रीचा अंधार असल्यानं ही काळ्या रंगाची कार कुणालाही दिसली नाही. हा प्रकार उघड झाल्यावर अग्निशमन दलाच्या सहाय्याने कारमधून दोघांना बाहेर काढण्यात आले. रात्री घटनास्थळी पोलीस देखील झाले आणि दोघांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करत आहेत.