पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या बॅगेतील पर्समध्ये ४ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. दरम्यान, बंडगार्डन रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत ७१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मूळचे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात असलेल्या दत्तनगर गावातील रहिवासी आहेत. कामानिमित्त ते पुण्यात आले होते. आळंदी ते स्वारगेट या मार्गावरील पीएमपी बसमधून ते १४ नोव्हेंबरला स्वारगेटला येत होते. बसमध्ये गर्दी होती. प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाच्या बॅगेतील पर्समधील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. स्वारगेट येथील पीएमपी स्थानकावर बस थांबल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जायभाय तपास करत आहेत. दरम्यान, बंडगार्डन रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्स ५० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वाडिया महाविद्याालयजवळ असलेल्या पीएमपी थांब्याजवळ थांबली होती. तेथून ते बसमधून जात असताना प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेचे लक्ष चुकवून पर्समधील मंगळसूत्र लांबविल्याचा प्रकार घडला होता़
पीएमपी प्रवासात दोघांचे दागिने लांबविले, पावणेपाच लाखांचा ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 2:37 PM
पीएमपीने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना चोरट्यांनी चांगलाच दणका देत पावणेपाच लाखांना लुटले.
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकाच्या बॅगेतील पर्समध्ये ४ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले बंडगार्डन रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्स ५० हजारांचे मंगळसूत्र लंपास