राजस्थानच्या उदयपूरमध्ये भरदिवसा एका व्यक्तीची हत्या झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीमा परिसरातून अटक केली आहे. मात्र, हिंदू संघटनांची निदर्शने ठिकठिकाणी सुरू आहेत. निषेध म्हणून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. रियाझ मोहम्मद असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो भीलवाडा येथील असिंद भागातील रहिवासी आहे. गोस मोहम्मद असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. तो उदयपूरच्या खांजीपीर भागातील रहिवासी आहे.पोलिसांनी खबरदारी घेत पुढील २४ तास इंटरनेट सेवा बंद केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेनंतर उदयपूरमधील धनमंडी, घंटाघर, हाथीपोल, अंबामाता, सूरजपोल, भूपालपुरा आणि सविना पोलीस स्टेशन परिसरात वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत येथे कर्फ्यू लागू राहील.उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीट येथे दोन जणांनी भरदिवसा एका तरुणाचा गळा चिरून खून केला. मृत तरुणाच्या ८ वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. याचा राग येऊन आरोपींनी मुलाच्या वडिलांची निर्घृण हत्या केली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
8 वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ केली पोस्ट, दिवसाढवळ्या वडिलांची हत्या
आरोपीला अटक करणारे पोलीस कर्मचारी गंजेंद्र सिंह यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी नाकाबंदीत पकडले गेले आहेत. दोघेही मोटारसायकलवरून पळून जात होते. पोलिस दोघांना घेऊन उदयपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्याकडून कोणतेही हत्यार सापडले नाही.अतिरिक्त पोलीस महासंचालक कानून हवासिंग घुमरिया यांनी उदयपूर हत्याकांडाचा व्हिडिओ व्हायरल करणे टाळण्याचे आवाहन जनतेला केले आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.