जळगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयातच ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याप्रकरणी शाखा अभियंता आर. आर. ठाकूर, अनुरेखक एच.के. हसबन यांना निलंबित तर करार पद्धतीवर घेतलेल्या शाखा अभियंता टी.एस. गाजरे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.
आकाशवाणी केंद्रामागे असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या या कार्यालयात मद्य पार्टी रंगल्याचा एक व्हिडिओ गुरुवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत याची चौकशी करण्यात आली असता तिघांची ओळख पटली. त्यानंतर मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंतांनी तातडीने कारवाई करीत ६ रोजी निलंबन व बडतर्फीचे आदेश काढले.
यामध्ये निलंबित करण्यात आलेल्या आर.आर. ठाकूर यांचे निलंबन काळात मुख्यालय नंदुरबार कार्यालय राहणार असून पूर्व परवानगी शिवाय त्यांना कार्यालय सोडता येणार नाही व इतर खाजगी नोकरीही स्वीकारता येणार नसल्याचे मुख्य अभियंत्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. अशाच प्रकारे अनुरेखक एच.के. हसबन यांना अधीक्षक अभियंत्यांनी निलंबित केले आहे.
नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी कार्यालयातच पार्टीमद्यपान करणाऱ्यांमधील टी.एस. गाजरे हे सेवानिवृत्त असून त्यांना सहा महिने कालावधीसाठी करार पद्धतीने २ ऑगस्टपासून शाखा अभियंता म्हणून घेतले होते. त्यानंतर ३ रोजी कार्यालयातच गाजरे यांच्यासह वरील तिघांनी मद्यपान सुरू केले. त्यामुळे नोकरी लागून एकच दिवस नोकरी केली नाही तोच ४ ऑगस्टपासून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे आदेश मुख्य अभियंत्यांनी काढले.