वर्धा : आर्वी तालुक्यातील पारगोठाण येथील एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वाहनात बसवून निर्जनस्थळी नेत बलात्कार केल्या प्रकरणी आर्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. अखेर पुणे जिल्ह्यातील रांजनगाव परिसरातील कारेगाव शिवारातून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पीडिता १३ आॅक्टोबरला सकाळी रोहणा येथील महाविद्यालयात गेली होती. तिची प्रकृती खालावल्याने ती पारगोठाण येथे बसने पोहचून घराकडे पायदळ जात होती. यावेळी कारमधून आलेल्या मुलांनी तिला अडवूून धमकावित तिला कारमध्ये बसविले. तसेच धनोडी डॅमकडे नेऊन तिला दारु पाजत तिच्यावर आळीपाळींनी अत्याचार केला. अशा तक्रारीवरुन आर्वी पोलिसांनी शुभम उर्फ प्रयोग प्रकाशराव पानबुडे (२९) व अशपाक अकबर शहा (२०) दोन्ही रा.धनोडी (बहादरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोघेही घटनेपासून फार झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेवरुन अप्पर पोलिस अधीक्षक, पुलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आणि आर्वीचे ठाणेदार यांनी घटनास्थळी जावून परिस्थितीची माहिती घेतली. स्थानिक गुन्हे शाखा व आर्वी पोलिसांच्या पथकाने सामूहिक तपास करुन आरोपीचा यवतमाळ, अमरावती, अकोला येथे जावून शोध घेतला. हे दोन्ही आरोपी चारचाकी वाहनाने पुण्याकडे पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिस पथकाने पुण्यात शोध घेतला असता ते कंपणीच्या कामाकरिता रांजनगाव परिसरात गेल्याची माहिती मिळाली. लगेच पोलिसांनी या परिसरात जावून तपास केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनेत वापरलेल्या चारचाकी वाहनाने कारेगाव येथे जाळ्यात अडकले.
दोघांनाही आर्वी पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, आर्वीचे ठाणेदार प्रशांत काळे, सहायक पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, राम खोत, मनोज धात्रक, संतोष दरगुडे, राजेश तिवसकर, अक्षय राऊत, विशाल मडावी, रामकिसन कास्देकर, निलेश करडे, राहूल देशमुख, शिवकुमार परदेशी यांनी केली. त्यांना पुणे ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या रांजनगाव येथील पोलिसांनी सहकार्य केले.