राम शिनगारे
औरंगाबाद : उसने दिलेले दीड हजार रुपये मागण्यासाठी रिक्षाचालक गेला असता त्यास पैसे तर देण्यात आलेच नाहीत, उलट त्याच्यावर हल्ला केला. त्यातून त्याचे दोन मित्र भांडण सोडविण्यास पुढे आले तर त्यांनाच चाकूने भोसकण्यात आल्याचा प्रकार रविवारी रात्री ११ वाजता एसबीओ शाळेसमोर घडला. या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
रवींद्र कुंभारे पाटील आणि प्रणिल वंजारे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. स्वप्निल सुखदेव जाधव (२५), आकाश उर्फ सोन्या ठोंबरे (२५, दोघे रा. ऑडिटर सोसायटी, मयूर पार्क), मनोज बनकर अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक विकास अवसरमल (रा. नवनाथनगर, हडको) हे फिर्यादी असून, ते आरोपी मनोज बनकरला उसने दिलेले दीड हजार रुपये मागण्यासाठी एसबीओ शाळेसमोरील कबीर पानटपरीजवळ गेले होते. बनकरला पैसे मागताच त्याने नकार दिला. तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. स्वप्निल जाधवने चाकूने अवसरमलवर हल्ला केला. अवसरमलचे मित्र रवींद्र कुंभारे पाटील, प्रणिल वंजारे यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न करताच स्वप्निलने रवींद्रच्या पोटात चाकू खुपसला. स्वप्निलने प्रणिलच्याही पाठीत चाकू मारला. दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे जमिनीवर कोसळले. त्यांना इतर नागरिकांनी दवाखान्यात नेले. या प्रकरणी विकास अवसरमल यांच्या तक्रारीवरून तिघांच्या विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
तासाभरात आरोपी गजाआड
घटनेची माहिती मिळताच हर्सूल ठाण्याचे उपनिरीक्षक रफिक शेख यांच्या पथकाने स्वप्निल व सोन्या या दोघांना बेड्या ठोकल्या. बनकर फरार झाला. पकडलेल्या आरोपींना तपास अधिकारी उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी न्यायालयात हजर केले असता, ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. जखमी रवींद्रवर घाटीत व प्रणिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी दोघांवर शस्त्रक्रिया झाल्या.