ठाणे - ठाणे रेल्वेस्थानकातून सुटलेल्या डोंबिवली लोकलमधील महिला डब्यात फेकलेल्या बाटलीने दोन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अखेर शनिवारी रात्री गुन्हा दाखल करून, त्या परिसरातील नशेबाज आणि मद्यपींची धरपकड सुरू करत चौकशीला प्रारंभ केला आहे. बाटली फेकल्याने आणखी कोणी जखमी झाले असल्यास त्यांनी पुढे यावे, असे आवाहनही ठाणे लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.सीएसएमटी-डोंबिवली ही लोकल शुक्रवारी रात्री ठाण्यातून सुटली. ही लोकल ठाणे रेल्वेस्थानकातून पुढे जात नाही, तोच मागील बाजूस असलेल्या महिला डब्यावर कोणीतरी काचेची बाटली फेकली. ती बाटली डब्यात उभ्या असलेल्या डोंबिवलीतील आशा पाटील यांच्या डोक्यावर आदळून फुटली आणि बाटलीचे तुकडे होऊन त्यातील काही तुकडे त्यांच्या हाताला आणि लोकलमधील सहप्रवासी सुष्मिता गावकर यांच्याही हाताला लागले. या दोन्ही जखमी महिलांना कळवा रेल्वेस्थानकात उतरवून त्यांच्यावर ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी सायंकाळपर्यंत कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही; मात्र पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत या घटनेची नोंद करून तपास सुरू केला होता. तक्रार दाखल करण्यासाठीही पोलिसांमार्फत प्रयत्न सुरू होते. अखेर, लोहमार्ग पोलिसांनी डोंबिवलीतील आशा पाटील यांचे घर गाठले. त्यानंतर, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.लोकलवर बाटलीफेक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी ठाणे रेल्वेस्थानक परिसरात मोहीम तीव्र करून नशेबाज आणि मद्यपींची धरपकड सुरू केली. शुक्रवारच्या या घटनेमध्ये लोकलमध्ये आणखी कोणाला दुखापत झाली असल्यास त्यांनी पुढे येऊ पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
लोकलवर बाटलीफेक, अखेर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 1:35 AM