रायगड ः कांद्याच्या दाेन गाेणी खरेदी करुन त्या बदल्यात विक्रेत्याला बनावट नाेटा देणाऱ्या तिघांना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. 49 हजार 900 रुपयांच्या बनावट नाेटा, प्रिंटर, लॅपटाॅपसह अन्य साहित्य पाेलिसांनी जप्त केले आहे. सदरची घटना 29 सप्टेंबर राेजी घडली आहे. तिन्ही आराेपीना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दयानंद गावडे यांनी दिली.
जयदीप अजीत घासे (26), सुमित सुनिल बागकर (26) आणि काैस्तुभ चंद्रकांत गिजम (24) सर्व राहणार अलिबाग अशी आराेपींची नावे आहेत. अन्य एका आराेपीचा पाेलिस शाेध घेत आहेत. 29 सप्टेंबर राेजी अलिबाग बायपास राेड येथे अशाेक पाेकळे यांच्याकडू जयदीप आणि सुमित यांनी दाेन कांद्याच्या गाेणी खरेदी केल्या. त्यानंतर शंभर रुपयांच्या 22 नाेटा असे दाेन हजार दाेनशे रुपये पाेकळे यांना दिले. त्यानतंर सदरच्या नाेटा बनावट असल्याचे लक्षात आले. रितसर तक्रार केल्यानंतर पाेलिसांनी तिन्ही आराेपींना अलिबाग येथूनच अटक केली. पाेलिसांना या गुन्ह्यात वापरलेले लॅपटाॅप, प्रिंटर, शाई, काेरे कागद ताब्यात घेतले आहे, तसेच 500 रुपयांच्या 63 नाेटा, 200 रुपयांच्या 82 नाेटा आणि शंभर रुपयांच्या 22 बनावट नाेटा हस्तगत केल्या आहेत. ज्याची चलनातील किंमत ही 49 हजार 900 रुपये हाेते.दरम्यान, आधीही या त्रिकुटाने मच्छिविक्रेत, काही दुकाने अशा विविध ठिकाणी बनवाट नाेटा वटवल्या असल्याचेही गावडे यांनी स्पष्ट केले.