नोएडा – गॅलरिया मॉलमध्ये झालेल्या बृजेश राय हत्याकांडात नवीन खुलासा समोर आला आहे. बिअर बॉटल मोजण्यात गडबड झाल्यामुळे वादाला सुरुवात झाली. त्यातून बृजेश रायचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांना अटक केली आहे तर इतर फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. बृजेश राय एका बॅटरी बनवणाऱ्या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होते. अलीकडेच मुंबईहून हे कुटुंब नोएडा येथे शिफ्ट झाले होते.
मागील सोमवारी नोएडाच्या सेक्टर ३९ येथे गार्डन गॅलरिया मॉलमध्ये लोस्ट लेमन रेस्टॉरंटमध्ये ते पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी इतर ५ मित्र हजर होते. रात्री उशीरा पार्टी संपल्यानंतर रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना ७ हजार बिल दिले. ज्यात बिअर बॉटलचा चार्जही समावेश होता. बृजेश राय आणि त्याच्या मित्रांनी जितक्या बिअर प्यायल्या त्याहून अधिक बिलात दाखवण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळे बिलातून रक्कम वगळावी अशी मागणी बृजेश राय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केली. त्यात वाद निर्माण झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला की हॉटेल सिक्युरिटी गार्ड आणि बृजेश राय मित्रांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळी बृजेश रायवर सर्वांनी हल्ला केला. यात बृजेशला लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण करण्यात आली. त्यात गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत बृजेशला पारस रुग्णालयात भरती केले. ज्याठिकाणी उपचारावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी बृजेशचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले.
मृत बृजेश रायच्या मित्रांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर हत्येच्या आरोपाखाली ९ जणांची ओळख पटवली. यात २ मॉल सिक्युरिटी गार्ड, ५ हॉटेल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली असून इतर २ जणांचा शोध घेतला जात आहे. ४ महिन्यापूर्वीच नवीन नोकरी मिळाल्यानंतर बृजेश राय कुटुंबासह मुंबईहून नोएडा येथे शिफ्ट झाला होता.
मृत बृजेशच्या पत्नीने सांगितले की, मला या घटनेबाबत कुणीही माहिती दिली नाही. पतीसोबत असलेल्या मित्रांनी दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल केल आहे. नवऱ्यासोबत असलेल्या मित्रांचीही चौकशी करा अशी मागणी पत्नीने केली आहे. पूजाने म्हटलंय की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याच्या मित्रांनी मला का कळवलं नाही? जेव्हा बृजेश रात्र झाली तरी घरी परतला नाही तेव्हा कॉल केला असता या घटनेची माहिती कळाली असं मृत बृजेशच्या पत्नीने सांगितले.