नालासोपारा (मंगेश कराळे) :- पूर्वेकडील अलकापुरी परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेच्या दोन महिन्यांच्या मुलाची खरेदी विक्री करणाऱ्या पाच आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी गुजरात राज्यात शिताफीने अटक केली आहे. तर अपहरण करून नेलेल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याची पोलिसांनी सुटका करून सुखरूप व सुव्यवस्थित त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना त्यांच्या ताब्यात दिले असून विरार पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.
नालासोपाऱ्याच्या अलकापुरी येथे राहणारी २३ वर्षीय महिला ही कचरा वेचण्याचा व्यवसाय करते. तिला दोन महिन्यांचा गोंडस मुलगा होता. तिची एकदम हलाखीची आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे मुलाचा सांभाळ करणे अवघड होते. तिची विरार येथील कुंभारपाडा येथे राहणारी व कचरा वाचणारी ओळखीची मावशी होती. तिने मुलाचा चांगला सांभाळ करणारे श्रीमंत घरातील लोक ओळखीचे असल्याचे आमिष मुलाच्या आईला दाखवले. मावशीने तिच्या ओळखीच्या आरोपी कृष्णाला याबाबत कल्पना दिली. आरोपी कृष्णाने गोविंद परमार (७१) आणि मुकेश दहिया (४८) या तिघांनी हे मूल वलसाड येथे राहणारे व एका कंपनीत काम करणाऱ्या भूषण सिंग (४६) यांना विकण्याचे ठरवले. भूषण सिंग यांना पाचही मुली असल्याने हा मुलगा विकत घेण्याचे ठरवले. २७ डिसेंबरला सकाळच्या वेळी भूषण यांनी कृष्णा याला २ लाख ३५ हजार रुपये देऊन दोन महिन्यांचे मूल विकत घेऊन वलसाड येथील घरी घेऊन गेले. मूलाचे आमिष दाखवून अपहरण करत फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर तिने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत विरार पोलीस ठाण्यात मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केला.
जलद गतीने अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी तीन पथके तयार केली. सदर पोलीस पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदार यांचेकडून माहिती मिळवून आरोपी बाळकृष्ण उर्फ कृष्णा कांबळे (३२) याला सफाळे येथून तसेच भाईंदरमधून गोविंद परमार (७१) आणि वलसाड येथून मुकेश दहिया (४८) या तिघांना ताब्यात घेतले. तर मूल विकत घेणाऱ्या भूषण सिंग (४६) यांनाही वलसाड येथून ताब्यात घेत चिमुकल्या मुलाची सुटका केली आहे. सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) अमोल मांडवे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, सागर बारवकर, सचिन घेरे, शंकर शिंदे, मुकेश तटकरे, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.