नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. याठिकाणी एका मुलाने मुलीला घरातून पळवून नेत लग्न केल्याने त्याच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांना पोलीस स्टेशनसमोरुनच मुलीच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. त्यानंतर संतापलेले नातेवाईकांनी मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली.
लग्नानंतर मुलाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगा आणि मुलीला संरक्षण देण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी तिथूनच मुलीच्या घरच्यांना फोन करुन माहिती दिली त्यानंतर मुलीच्या घरचे पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले. मुलगा आणि मुलगी जसे पोलीस ठाण्याबाहेर निघाले तेव्हा त्या दोघांना बळजबरीनं उचलून घेऊन गेले. गंभीररित्या जखमी मुलावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो मृत्यूशी संघर्ष करत आहे. मुलाच्या घरच्यांनी सांगितले की, २३ वर्षीय युवक कुटुंबासह राजौरी गार्डन टीसी कॅम्प परिसरात राहत होता. सूरज आणि रोशनी (बदललेलं नाव) एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांनी १५-२० दिवसांपूर्वी घरातून पळून जात लग्न केले. त्यानंतर जीवाला धोका आहे असं सांगत बुधवारी संध्याकाळी ५ वाजता राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात पोहचले. दोघांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले.
मुलाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी फोन करुन माहिती दिली तेव्हा तिचे नातेवाईक पोलीस ठाण्याबाहेर पोहचले. पोलिसांकडून सुरक्षा मिळालीच नाही मात्र पोलीस ठाण्याबाहेरुनच दोघांचं अपहरण करुन सागरपूरला घेऊन गेले. त्याठिकाणी सूरजला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. रक्ताच्या थारोळ्यात सूरजला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सूरजची अवस्था गंभीर असून तो जगण्यासाठी संघर्ष करत आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत गौतम म्हणाले की, पोलिसांनी सफदरजंग हॉस्पिटलमधून सूचना मिळाली होती. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. पीडित मुलगा राजौरी गार्डन टीसी कॅम्प येथे राहण्यास होता तर मुलगी सागरपूर परिसरात राहायला होती. दोघंही बुधवारी दिल्लीत आले होते. तर मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. मुलीच्या घरच्यांनी दुसरीकडून मुलीने पळून जात लग्न केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांना जबरदस्तीनं उचलून नेत सागरपूर परिसरात घेऊन गेले. या प्रकरणात हत्येचा प्रयत्न आणि अपहरण याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या घरच्यांचा शोध घेतला जात आहे.