लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्रेयसीला मारहाण करीत कारची धडक देत जखमी केल्याचा प्रकार उघड होऊन तीन दिवस उलटले तरी अश्वजित गायकवाड याच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. पीडित तरुणीने समाजमाध्यमांवर न्याय देण्याची मागणी केली आहे. कासारवडवली पोलिसांनी अश्वजित याच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घोडबंदर वाघबीळ भागात ही २६ वर्षीय पीडित तरुणी राहते. ती नवी मुंबई परिसरात सलूनचा व्यवसाय करते. अश्वजित गायकवाडसोबत गेल्या साडेचार वर्षांपासून आपले प्रेमसंबंध असल्याचा दावा तिने केला. ११ डिसेंबर रोजी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास अश्वजितने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ तिला भेटण्यास बोलावले. तिथे गेल्यानंतर तो बोलला नाही. यातूनच झालेल्या वादातून त्याने तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच डाव्या हाताला चावा घेतला. त्याचा मित्र रोमिल पाटील यानेही शिवीगाळ केली. यानंतर अश्वजितच्या कारमध्ये ठेवलेली बॅग व मोबाइल घेत असताना कारचालक सागर शेडगे याने तरुणीला कारने धडक दिली. यात उजव्या पायाच्या गुडघ्याचे खालील हाड मोडले. तसेच शरीरावर दुखापत झाल्याचे तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेतील वस्तुस्थिती वेगळी आहे. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. संबंधित तरुणी गेल्या काही वर्षांपासून लोकांना ब्लॅकमेलिंग करते. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. तिला चिरडले नसून तिला गाडीचे फूटरेस्ट लागले. चुकीच्या बातम्या पसरविण्यात येत आहेत.- अनिल गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी (अश्वजित गायकवाडचे वडील)
अपघातग्रस्त तरुणीचा आणि तिचा मित्र अश्वजितचा वाद झाल्यानंतर तिने त्याच्या मोटारीच्या दरवाजाच्या हॅन्डलला धरून ती थांबविण्याचा प्रयत्न केला. गाडीचे फूटरेस्ट लागून ती पडली आणि जखमी झाली. चालक सागर शेडगेच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने तिला लगेच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याचे पैसेही त्याने भरले. अपघाताचा गुन्हा दाखल आहे.- सुनील पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कासारवडवली
न्यायाची मागणीसमाजमाध्यमांवरही तरुणीने न्यायाची मागणी केली. कुटुंबातील आपणच मुख्य कमावती सदस्य असल्याची व्यथा तिने मांडली आहे. तिच्या तक्रारीवरून अश्वजित, रोमिल आणि सागर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.