मथुरा-
यूपीच्या मथुरामध्ये पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठी घटना टळली आहे. मांट टोलनाक्याआधी थांबलेल्या एका कारमधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये पाहिलं तर एक मुलगी किंचाळत होती आणि तिच्यासोबत एक व्यक्ती होता ज्याच्या हातात पिस्तुल होतं. यावर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मुलीला वाचवलं आणि चौकशीला सुरुवात केली.
पोलीस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार फिरोज नावाच्या व्यक्तीनं आपल्याच मैत्रिणीला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं आणि तिला यमुना एक्स्प्रेस वेच्या रस्त्यानं आग्राकडे घेऊन जात होता. दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. रात्री जवळपास नऊ वाजताच्या सुमारास मांट टोलनाक्याच्याआधी त्यानं कार थांबवली आणि पिस्तुल बाहेर काढलं. मॅगझीन लोड करू लागला आणि हे पाहताच तरुणी किंचाळू लागली.
जवळच पोलीस होते आणि ते तातडीनं कारकडे पोहोचले. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून चलाखीनं माथेफिरूला पकडलं आणि तरुणीचा जीव वाचवला. दोघंही दिल्लीतील एका कंपनीत एकत्र काम करत होते आणि याचदरम्यान त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर रिलेशनशीपमध्ये होते. पण दोघंही विवाहित आहेत, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.
दोघांमध्ये झालं होतं भांडणकाही महिन्यांआधी दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. यानंतर दिल्लीतील नोकरी सोडून नोएडामध्ये एका कंपनीत तरुणीनं नोकरी सुरू केली. शुक्रवारी फिरोज यानं तरुणीला बंदुकीचा धाक दाखवत तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं. तो तिला काहीतरी नुकसान पोहोचवण्याच्या इराद्यात होता. पण पोलीस वेळीच घटनास्थळावर पोहोचल्यानं तरुणीचा जीव वाचला.