पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाने स्पा सेंटरमध्ये घुसून आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या केली. लुधियानातील दुगरी भागात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि हत्येत वापरलेला चाकूही जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला दुगरी येथील हिम्मत सिंह नगर भागातील एका स्पा सेंटरमध्ये काम करत होती. अकविंदर कौर उर्फ कक्की असं तिचं नाव होतं. ती डेहलो गावची रहिवासी होती. तिला दोन मुलं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकविंदरचा तिच्या पतीसोबत सुमारे दीड वर्षांपासून वाद सुरू होता. यामुळे ती तिच्या मुलांसह तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. या काळात त्याची सिमरनजीत सिंह नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. सिमरनजीतला अकविंदरशी लग्न करायचं होतं. त्याला अकविंदरने स्पा सेंटरमधील तिची नोकरी सोडावी असं वाटत होतं. पण अकविंदर नोकरी सोडायला तयार नव्हती. या प्रकरणावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं होत असत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिमरनजीतने यापूर्वीही अकविंदरला मारहाण केली होती. अकविंदरने डेहलोन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर दोन दिवसांपूर्वीच तोडगा काढण्यात आला. आरोपीने लेखी स्वरूपात सांगितलं होतं की, तो अकविंदर कौरला पुन्हा त्रास देणार नाही. पण गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास, जेव्हा अकविंदर स्पा सेंटरमध्ये काम करत होती, तेव्हा सिमरनजीत तिथे पोहोचला आणि तिच्याशी वाद घालू लागला. जेव्हा अकविंदरने त्याला बाहेर जाण्यास सांगितलं तेव्हा सिमरनजीतने चाकू काढला आणि हल्ला केला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अकविंदरला दीप रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अकविंदरच्या कुटुंबीयांच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी सिमरनजीतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोकांनी सांगितलं की, हत्या केल्यानंतर आरोपी अकविंदरच्या मृतदेहाजवळ बसला आणि ढसाढसा रडू लागला आणि चाकूकडे पाहत राहिला. यानंतर तो उठला आणि आत गेला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी त्याला अटक केली.