जयपूर - प्रेम आंधळं असतं अशी म्हण खूप प्रचलित आहे पण खरेच असं असतं का? हा, जेव्हा कधी एकतर्फी प्रेमातून सनकी व्यक्ती काही पाऊल उचलतो तेव्हा ते हैराण करणारं असते. शुक्रवारी जयपूर इथं पती-पत्नीची गोळी मारून हत्या केली आहे. या हत्येतील गुन्हेगारांना जेव्हा पोलिसांनी अटक केली, त्याच्या चौकशीतून जे समोर आलं ते सगळ्यांसाठी धक्कादायक होते. आरोपी एका महिलेवर प्रेम करत होता आणि तिचा पती, मुले त्या प्रेमात अडसर होते, त्यामुळे त्यांना धडा शिकवायचा असं प्लॅनिंग त्याच्या डोक्यात शिजत होते.
आरोपीने दागिने विकून देशी कट्टा खरेदी केला आणि हत्या करण्यासाठी पोहचला. मुले शाळेत गेली होती म्हणून बचावली. घरात महिला आणि तिचा पती होता. पतीला गोळी मारल्यानंतर पत्नी जोरदार किंचाळली तेव्हा तिच्यावरही गोळी झाडण्यात आली. राजूराम मीणा त्याची पत्नी आशा मीणा, भाऊ आसाराम मीणा, बहीण मिनाक्षी आणि मुलासह शांतीविहार कॉलनीत राहत होते. राजूची पत्नी आशा मीणा, त्याचा भाऊ आसाराम आणि हत्या करणारा आरोपी मोनू पंडित एकाच फॅक्टरीत काम करत होते. मोनू आणि आशा एकमेकांशी बोलायचे. बोलणं होण्यासाठी मोनूने आशाला मोबाइलही दिला होता. दोघांमध्ये अनेकांच्या नकळत संवाद व्हायचा. काही दिवसांपूर्वीच आशाचा नवरा आणि दीर यांना ती मोनूशी बोलत असते हे कळलं, त्यानंतर राजूराम मीणा आणि आसारामने मोनूला खडसावत आशाशी बोलू नकोस अशी धमकी दिली.
घरात लपवलेला मोबाईल सापडला
एकेदिवशी राजूचा भाऊ आसारामला घरातील कपाटात कपड्यांमध्ये लपवलेला मोबाईल सापडला. त्यादिवशी आशा फॅक्टरीत कामाला गेली होती. ती जेव्हा घरी परतली तेव्हा पती आणि दीराने मोबाईल कुठून आला म्हणून विचारणा केली. हा मोबाईल मोनूनं त्याच्याशी बोलण्यासाठी दिलाय असं आशाने घरच्यांना सांगितले. त्यानंतर आशाचा नवरा आणि आसाराम दोघांनी फॅक्टरीत जात मोनूशी वाद घातला. भविष्यात पुन्हा हे करू नकोस असं बजावले. या घटनेपासून राजूने त्याच्या पत्नीला फॅक्टरीत काम करण्यास पाठवायचं बंद केले.
बदला घेण्यासाठी घरी आला अन् गोळी झाडली
आशा ७ दिवसांपासून कामाला जात नव्हती. मोनूही ३ दिवस गायब होता. शुक्रवारी राजू मीणाला कॉल करून त्याने घरी येतोय, आपल्यातील वाद संपवण्यासाठी बोलायचं आहे असं सांगितले. राजूने त्याला घरी येण्यास मनाई केली तरी तो सकाळी ११ वाजता घरी आला. त्यावेळी राजूची छोटी बहीण मिनाक्षी घरात होती. राजूने बहिणीला बाहेर पाठवून मोनूशी बोलत होता. त्याचवेळी अचानक मोनूने देशी कट्टा बाहेर काढला आणि राजूच्या डोक्यात गोळी झाडली. हा आवाज ऐकून आशाही बाहेर आली तेव्हा तिच्यावरही मोनूने गोळी चालवली.
संपूर्ण कुटुंबाला संपवायचं होतं, पण...
आशाच्या प्रेमात वेडा झालेला मोनू पंडितला राजूच्या पूर्ण कुटुंबाला संपवायचे होते. राजू आणि आशाची हत्या करून तो मुलांच्या स्कूलमध्येही गेला परंतु शाळेने त्याला प्रवेश दिला नाही तर राजूचा भाऊ आसाराम फॅक्टरीत गेला होता. बहीण दुसऱ्याच्या घरी गेली होती त्यामुळे मोनूला त्यांचीही हत्या करता आली नाही.