मुंबई - शहरात ड्रग्जमाफिया आणि पेडलर्स यांची वाढती दहशत लक्षात घेता त्यांच्यावर धडक कारवाया करणाऱ्या गुन्हे शाखेचे अमली पदार्थविरोधी पथक आणखी मजबूत बनले आहे. कारण या पथकात ‘शायना’ दाखल झाली आहे. ड्रग्जमाफिया आणि पेडलर्स हे वेगवेगळ्या शक्कल लढवून ड्रग्जची तस्करी करतात. मात्र, ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांच्या ‘शायना’ आता मुसक्या आवळणार आहे.
मुंबई अमली पदार्थविरोधी (एएनसी) पथकात ‘शायना’ नावाची नवीन डॉग दाखल झाली असून अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ती काम करणार आहे. लॅब्राडोर या कुत्रांच्या जातीची ‘शायना’ 14 महिन्यांची आहे. राजस्थानच्या डेरा अल्वर येथे अमली पदार्थ शोधण्याचे सहा महिने प्रशिक्षण घेऊन आली आहे. मुंबई शहरात अमली पदार्थविरोधी पथकाची पाच युनिट कार्यरत असताना आता या युनिटच्या सोबतीला ‘शायना’ या डॉगची मदत असणार आहे. ‘शायना’ आमच्या पोलीस दलात दाखल झाल्यामुळे नक्कीच आमची ताकद आणखी वाढली आहे. यापुढे ड्रग्जमाफियांचे कंबरडे मोडण्यासाठी तिची मदत मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वीच ड्रग्ज माफियांनी पोलिसांवर भायखळा परिसरात जीवघेणा हल्ला केला होता. तसेच आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात देखील आगमन गेटजवळ अचानक धडक देऊन शायना परदेशातून ड्रग्ज पुरविणाऱ्या तस्करांच्या नाकी दम आणणार आहे.