मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा (७४) ऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला आहे. लकडावालाला जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले आहे. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांचे एक पथक आर्थर रोड कारागृहात तपासासाठी गेले असून अपमृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रताप भोसले यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. नेमका मृत्यू कशामुळे हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल असे भोसले पुढे म्हणाले.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला (yusuf lakdawala) ईडीकडून (ED) मे (2021) महिन्यात अटक करण्यात आली होती. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि बॉलीवूडसह डी गँगचा फायनान्सर युसुफ लकडावाला यांची सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) चौकशी केली होती. खंडाळा येथील हैदराबादच्या निजाम कुटुंबियांच्या मालकीची ५० कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती मनी लाँड्रीग प्रकरणी अटक केली होती.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व बॉलीवूड फायनान्सर युसुफ लकडावालाविरोधात मुंबईपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. युसुफ लकडावालाला(७४) गुजरातमधून आर्थिक गुन्हे शाखेने १२ एप्रिल २०१९ ला अहमदाबाद येथून अटक केली होती. लकडावाला विमानाद्वारे लंडनला जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. आरोपींनी मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील बडगुजर यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा लकडावालासह मोहन नायर नावाच्या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपींनी ऍफेडिव्हीट कम डीड ऑफ कन्फर्मेशन बनावट केल्याचा आरोप आहे. तसेच न झालेला व्यवहार या कागदपत्रांच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार उघड होऊ नये यासाठी मुंबईतील नोंद करण्यात आलेले नोंदणी क्रमांक वापरले. तसेच मूळ कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
युसूफ लकडावाला यांनी गुरुवारी ईडी कार्यालयात जबाब नोंदवला. याआधी अनेक वेळा समन्स बजावूनही लकडावाला चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. याआधी, अभिनेत्री साधना यांची राहती जागा बळकावून धमकावल्याबद्दल युसूफ लकडावाला आणि त्यांच्या पत्नीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.