अलिबाग : अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी आणि एजंट राकेश चव्हाण यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केल्यानंतर त्यांच्या विक्रोळीतील घरातून एक कोटी रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.
न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्या न्यायालयात शनिवारी सुनावणी झाली. न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. भूषण साळवी, तर आरोपी पक्षातर्फे ॲड. प्रवीण ठाकूर आणि ॲड. अंकुश मोरे यांनी काम पाहिले.
फिर्यादी यांच्या सासऱ्यांना मिळालेल्या बक्षीसपात्र जमिनीवर नाव चढविण्यासाठी आणि सासऱ्याच्या भावाने बक्षीसपत्रावर घेतलेल्या हरकतीच्या अपील प्रकरणाचा निकाल सासऱ्यांच्या बाजूने द्यावा, यासाठी दळवी यांनी तीन लाखांची लाच मागितली होती. याबाबत फिर्यादींनी २८ सप्टेंबरला रोजी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दि. २९ सप्टेंबर रोजी पथकाने याबाबत सत्यता पडताळून रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
महिनाभरापासून लाचलुचपत प्रतिबंधक पथक हे तहसीलदार दळवी यांच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबरला सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली, तर दळवी यांच्यासाठी पैसे घेतल्याचे चव्हाण याने सांगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.
अजून घबाड मिळण्याची शक्यता मीनल दळवी याची दीड वर्षभरापूर्वी अलिबाग तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. दळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. त्यांच्या अलिबाग येथील घराची तपासणी केली असता, ६० तोळे सोने आणि २८ हजार रोकड मिळाली आहे.