मनीषा म्हात्रे
मुंबई : फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जामिनासाठी ५० लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली महिला पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शर्मा यांनी 25 लाख उकळल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे.
चेंबूर परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणीने केलेल्या आरोपानुसार, त्यांचा वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कोर्टात वाद सुरु आहे. दुसरीकडे याच मालमत्तेच्या सेटलमेन्टसाठी चेंबूर पोलिसांकडून दबाव वाढला. त्यानंतर, १८ नोव्हेंबर २०२० मध्ये कार खरेदी विक्रीचा व्यवसाय असलेल्या भावाला फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जामिनासाठी पैशांची मागणी वाढली. धक्कादायक बाब म्हणजे शर्मा या कोरोना बाधित असताना पोलीस ठाण्यात आल्या. तेथे निलंबित पोलिस अधिकारी अनिल उर्फ भाणुदास जाधव आणि खासगी इसम राजु सोनटक्के यांनी भावाच्या सुटकेसाठी ५० लाखांची मागणी केली. पैसे नाही तर जवळपास १५ कोटी किंमतीची मालमत्ता नावावर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यापूर्वी शर्मा यांनी २५ लाख उकळले आहे. त्यानंतर, चार महिन्यापूर्वी त्यांनी याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला. त्यानुसार चौकशी अंती गुरुवारी रात्री चेंबूर पोलीस ठाण्यात शर्मासह निलंबित पोलिस अधिकारी अनिल आणि राजु सोनटक्के यांच्या विरोधात चेंबूर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित व्हिडीओ, रेकॉर्डिंग गुन्हे शाखेच्या कक्ष ६ कडे देण्यात आले असून त्यानुसार गुन्हे शाखा अधिक तपास असल्याचे सांगितले. याबाबत शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा नंबर बंद लागत आहेत. शर्मा या धडाकेबाज महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात, पोलीस महासंचालक पदानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.