जळगाव : जादा वेतनाची परतफेड करण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुकूल अहवाल पाठवायच्या बदल्यात प्रत्येक दोन हजाराची लाच घेताना कंडारी बुद्रकु, ता.धरणगाव येथील ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय ४५)याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी चोपडा नजीक एका हॉटेलमधून पकडले. धरणगाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी सुरेश शालीग्राम कठाळे (वय ५१) यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यातील एक हजार रुपये हे कठाळे याच्यासाठी होते.
तक्रारदार ग्रामपंचायत कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणून नोकरीस असून त्यांना सन-२०१५-१६ या वित्तीय वर्षात त्यांना जादा वेतन दिले गेले होते. जादा देण्यात आलेल्या रक्कमेची परतफेड करण्याबाबत तक्रारदार यांना नोटीस आली होती. या नोटीसचा अनुकूल अहवाल जिल्हा परीषदेला पाठविण्याच्या मोबदल्यात आरोपी ग्रामसेवक सपकाळे व विस्तार अधिकारी कठाळे यांनी शिपायाकडे प्रत्येकी एक हजार या प्रमाणे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.