लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात मुख्य लिपिक असलेले उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव (वय ५२) यांना आज उशिरा रात्री एसीबीच्या पथकाने जेरबंद केले.या प्रकरणातील तक्रारदार हे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथील रहिवासी आहे. ते प्रांजली माध्यमिक विद्यालय नंदपा शाळेत चपराशी म्हणून कार्यरत आहेत. नियुक्तीच्या वेळी त्यांची शाळा अनुदानित नव्हती. १ जुलै २०१६ पासून या शाळेला २० टक्के अनुदान प्राप्त झाले. त्यानुसार त्यांनी शासनाचे निर्णयानुसार २० टक्के अनुदान मिळण्याकरिता प्रपत्र भरून शाळेतील मुख्याध्यापक यांच्यामार्फत शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांच्या कार्यालयात प्रस्ताव डिसेंबर २०१८ मध्ये सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या मंजुरीबाबत तक्रारदार हे शिक्षण उपसंचालक नागपूर विभागात मुख्य लिपिक उपेंद्र श्रीवास्तव यांना भेटले. त्यांनी तक्रारदारास वेतनाचे प्रपत्र अ आणि ब ची फाईल देण्याकरिता ५९ हजार रुपयांची मागणी केली. लाच द्यायची नसल्यामुळे तक्रारकर्त्यांनी एसीबी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी पडताळणी केली. तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यानंतर ५० हजार रुपये घेऊन तक्रारदार श्रीवास्तवकडे पोहोचले. श्रीवास्तवने त्यांना रात्री उशिरापर्यंत इकडे तिकडे फिरवून नंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर चौकात बोलावले आणि तिथे लाचेची रक्कम स्वीकारली. त्याच क्षणी एसीबी पथकाने श्रीवास्तव यांच्या मुसक्या बांधल्या. वृत्त लिहिस्तोवर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
५० हजारांची लाच : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 12:49 AM