यवतमाळ : शेताचा फेरफार घेण्यासाठी हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी गुरुवारी हा आदेश दिला.
संजय आनंदराव निंभोरकर असे शिक्षा झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. हा तलाठी बाभूळगाव तालुक्यातील कोंढा येथे कार्यरत होता. त्याने १७ सप्टेंबर २०१३ ला फेरफार घेण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबी पथकाच्या समक्ष तलाठ्याने ही लाच स्वीकारली. त्याला रंगेहात पकडून एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख व पोलीस निरीक्षक एस.एन. सोनोने यांनी गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायाधीश किशोर पेठकर यांनी खटल्यात पाच साक्षीदार तपासले. त्यानुसार आरोपी संजय निंभोरकर याला कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार तीन वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंड, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम १३ (१) (ड), १३ (२) मध्ये तीन वर्ष सक्त मजुरी, ५०० रुपये दंड ठोठावला. या शिक्षा आरोपीला एकत्र भोगावयाच्या आहेत. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी बाजू मांडली. त्यांना एसीबीतील सहायक फौजदार उत्तम आत्राम यांनी सहकार्य केले.