मध्य प्रदेश पोलिसांनी मंगळवारी PWD इंजिनिअर पीके गुप्ता याला ग्वाल्हेरमध्ये 15,000 रुपयांची लाच घेताना अटक केली. लाच घेताना पकडलेल्या आरोपीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये इंजिनिअर विनवणी करताना दिसत आहे. अटक टाळण्यासाठी तो पोलिसांच्या पाया पडला. ब्लड प्रेशर वाढल्याचं आणि हार्ट अटॅक आल्याचं नाटकही केलं.
कंत्राटदार महेंद्र सिंह यांनी भिंड जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांच्या बंगल्यावर 3 लाख रुपयांचं इलेक्ट्रिक फिटिंगचं काम केलं होतं आणि नंतर बिल पास करण्यासाठी पीडब्ल्यूडीचे एग्जीक्यूटिव्ह इंजिनिअर पंकज कुमार गुप्ता याच्याकडे पोहोचले. परंतु बिल पास करण्याच्या बदल्यात गुप्ताने 75 हजार रुपयांची लाच मागितली. ठेकेदाराने कसेतरी 55,000 रुपये दिले. मात्र त्यानंतरही इंजिनिअरची पैशाची हाव कमी झाली नाही.
लाच घेताना रंगेहाथ पकडताच पीडब्ल्यूडी इंजिनिअर पीके गुप्ताने ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक आल्याचं नाटक केलं. मात्र अधिकाऱ्यांनी त्याला सोडलं नाही. तसेच घटनास्थळी डॉक्टर व रुग्णवाहिका बोलावली. डॉक्टरांनी इंजिनिअरची तपासणी देखील केली आणि कोणतीही समस्या नसल्याचं सांगितलं. या संपूर्ण कारवाईदरम्यान आरोपी इंजिनिअर स्वत:ला वाचवण्याची विनंती करत होता. त्याने स्वत:ला निर्दोष घोषित करून अधिकाऱ्यांच्या पायाला हात लावायला सुरुवात केली.
महेंद्र सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 70 हजार रुपये ठरले होते. त्यानुसार त्यांनी इंजिनिअरला 55 हजार रुपये दिले आहेत. यानंतर पीके गुप्ता यांनी आणखी 15 हजार रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्रस्त कंत्राटदाराने ग्वाल्हेर लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली. तसेच य व्यवहाराबाबतचे संभाषण रेकॉर्ड केलं. यानंतर इंजिनिअरला पकडण्यात यश आलं आहे.